धुळे : हद्दवाढीच्या ११ गावांमध्ये सध्या पाण्याची टंचाई तीव्र जाणवत आहे. त्याच्या निवारण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कायमस्वरुपी टंचाई निवारण्यासाठी नव्याने २२ जलकुंभ उभारण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. सप्टेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिली.
अक्कलपाडा योजनेचे काम झाल्याने शहरात आता तीन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा होत आहे, तसेच शहरात नव्याने बांधलेल्या ७ जलकुंभाचा वापर होण्यास प्रारंभ करण्यात आलेला आहे. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात हद्दवाढीच्या भागात २२ नवीन जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या कामाला प्रारंभ झालेला आहे. नवीन होणाऱ्या जलकुंभामुळे पाणी साठवण क्षमता २२ लाख लिटरने वाढू शकेल. परिणामी हद्दवाढीच्या गावात नियमित पाणी मिळण्यास मदत होणार आहे.
महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानुसार अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत या कामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. तो शासनाने मंजूर केलेला आहे. त्यानंतर निविदा काढण्यात येऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून कामाला प्रारंभ झाला आहे. हद्दवाढीच्या भागात नवीन २०० किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. तसेच २२ जलकुंभ बांधण्यात येतील. या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी साहित्य आणण्यात येत आहे. मोराणे आणि हनुमान टेकडी भागात पाइप उतरविण्यात आले आहे. नवीन जलकुंभ झाल्यावर सरासरी २२ लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढेल. भविष्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तरी या भागात नियमित पाणी मिळू शकणार आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत काम
पाणीपुरवठा योजनेचे काम दीड वर्षात अर्थात सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मनपा हद्दीत समाविष्ट गावांमध्ये सुमारे २३ हजार मालमत्ताधारक आहेत. ३२ हजार ६१६ बखळ जागा आहेत. या भागात साधारणपणे १ लाख नागरिकांचे वास्तव्य आहे. हीबाब विचारात घेऊन काम मार्गी लागत आहे.४० वर्षांचा आराखडा
हद्दवाढीच्या भागात सद्य:स्थितीत रोज १० एमएलडी पाणीपुरवठा होतो. नवीन जलकुंभ झाल्यावरही तेवढाच पाणीपुरवठा होईल. योजनेचा आराखडा हा पुढील ४० वर्षांचा विचार करून तयार करण्यात आलेला आहे. भविष्यात या भागाचा विस्तार लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे.