धुळे - जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त २८ कुटुंबांच्या मदतीचे २४ प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले. तीन अपात्र ठरविले असून एक प्रस्तावाची फेरचौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा शेतकरी आत्महत्या निर्मूलन समितीच्या दोन-अडीच महिन्यानंतर नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे समितीची बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे प्रस्ताव प्रलंबित होते. मंगळवारी समितीपुढे २८ प्रस्ताव विचारार्थ ठेवण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वीज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, जिल्हा अग्रणी बॅँक यांचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी डॉ.धनंजय नेवाडकर आदी उपस्थित होेते. धुळे तालुक्यातील सर्वाधिक प्रस्ताव पात्र; एक फेरचौकशीसाठीसमितीपुढे विचारार्थ ठेवलेल्या २८ प्रस्तावांपैकी धुळे ग्रामीणच्या ९ प्रस्तावांपैकी ८ प्रस्ताव पात्र ठरविण्यात आले तर एक प्रस्ताव फेरचौकशीसाठी पाठविण्यात आला. शिंदखेडा तालुक्यातील ९ प्रस्तावांपैकी ६ प्रस्ताव पात्र तर ३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. साक्री तालुक्यातील सर्व तिन्ही प्रस्ताव पात्र ठरले. शिरपूर तालुक्यातून एक प्रस्ताव होता, तो पात्र ठरला. धुळे शहर परिसरातून ३, पिंपळनेर परिसरातून दोन व दोंडाईचा परिसरातून एक असे सर्व प्रस्ताव पात्र ठरले.एक लाखाची मदतशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास शासनाकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यातील ३० हजार रुपये रोख स्वरूपात तर उर्वरीत ७० हजार मुदतठेव स्वरुपात असतात. त्याचे व्याज या कुटुंबास मिळते. चरितार्थ चालविण्यासाठी या पैशांची त्यांना मदत होते.
मदतीसाठीचे २४ प्रस्ताव पात्र ठरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 4:19 PM