आॅनलाइन लोकमतधुळे : दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्राची सर्वाधिक आवड आहे, याविषयीचा विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोबाईलद्वारे कल चाचणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यात ४५६ शाळांमधील ३४ हजार ८१२ पैकी २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिल्याची माहिती कल चाचणीच्या जिल्हा समन्वयक जयश्री पाटील यांनी दिली आहे. भविष्यातील करिअरच्या वाटा निवडतांना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाऊंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. दहावीनंतर कुठले क्षेत्र निवडायचे, याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. त्यासाठी ही कल चाचणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या कलमापन चाचणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यास तसेच त्यांची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, हे कळण्यास मदत होणार आहे.चाचणी घेण्यास मुदतवाढजिल्ह्यात १८ डिसेंबरपासून कलमापन चाचणी घेण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी पहिल्यांदाच मोबाईल अॅपचा वापर करण्यात येत आहे. ही चाचणी २० जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश होते. मात्र आता कलचाचणी घेण्यास मुदतवाढ मिळालेली असून, ५ फेब्रुवारीपर्यंत ही चाचणी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३४ हजार ८१२ एवढी आहे. २२ जानेवारी अखेरपर्यंत २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिलेली आहे. जिल्ह्यात कल चाचणीचे प्रमाण ८० टक्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. यात धुळे ग्रामीणमध्ये ६ हजार ९९, साक्री तालुक्यातील ६ हजार १९, शिंदखेडा तालुक्यातील ४ हजार ५७३, शिरपूर तालुक्यातील ४ हजार ९८२ व धुळे शहरातील ६ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल चाचणी दिलेली आहे. यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, तसेच कलचाचणीच्या जिल्हा समन्वयक तथा डायटच्या वरिष्ठ अधिव्याख्याता जयश्री पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.
धुळे जिल्ह्यात २५ हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 11:28 AM
१८ डिसेंबरपासून सुरू झाली आहे विद्यार्थ्यांची कलचाचणी
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यात ४५६ शाळा३४ हजार ८१२ पैकी २५ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी दिली चाचणी५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ