डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याच्या टाकीवर झाकण ठेवावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
डेंग्यूने होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात शासनाला यश आले आहे. डेंग्यू विरोधी उपाययोजनांच्या अंमलबजावणीमध्ये नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. एडिस इजिप्ती या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे डेंग्यूची लागण होते. डेंग्यू संसर्गित व्यक्तीला डास चावला तर डास संसर्गिक होतो. त्यानंतर हा डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्या व्यक्तीला डेंग्यूचा संसर्ग होतो
अशी घ्यावी काळजी
डास चावल्यानंतर साधारण: ५ ते ७ दिवसांनंतर डेंग्यूची लक्षणे दिसायला लागतात. डेंग्यू ताप फ्लूसारखाच आहे. तो डेंग्यू -१, डेंग्यू -२, डेंग्यू -३, डेंग्यू -४, या विषाणूपासून होतो. एडिस डासांची लांबी ६-६ मिमी असते. या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याला टायगर मॉस्किटो म्हणतात. हा डास दिवसा चावतो. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू दोरी, लाइटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यामधून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास अळी असलेली भांडी घासून पुसून -धुवून स्वच्छ ठेवावी.
अशी रोखा डासांची उत्पत्ती
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवती व परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू फेकाव्यात. खराब टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचे भांडे, ड्रम, रांजण व्यवस्थित झाकून ठेवावे. झाकण नसल्यास जुन्या कपड्याने झाकावेत, पाण्याच्या टाक्यांना झाकणे बसवावी. शौचालयाच्या व्हेंट पाइपला जाळी अथवा कापड बांधावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळवा. घराजवळील डबके बुजवावे. डबक्यात गप्पी मासे सोडावे. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावी.
डासांपासून संरक्षण
मच्छरदाणीचा वापर वैयक्तिक सुरक्षिततेसाठी करावा. विशेषत: कीटकनाशक भारित मच्छरदाणी वापरावी. डास प्रतिबंधक मलम, अगरबत्ती वापरावी. घराच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावावेत. डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे हौदात, विहिरीत व डबक्यात सोडावे. डेंग्यू तापाची लागण झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटीमॉल गोळी घ्यावी, तसेच रक्त व रक्तजल नमुन्याची तपासणी करून घ्यावी. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.
कोट
काळजी घेणे गरजेचे
चिकटलेली अंडी नष्ट होतील. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी आणि गंभीर रुग्णास रक्तस्राव होतो.
अनिल पाटील
जिल्हा हिवताप अधिकारी.