धुळे,दि.9- : तालुक्यातील अजंग पाईप कारखाना जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने कामापेक्षा जास्त निधी काढून घेऊनही वर्गखोल्यांचे व शौचालयाचे बांधकाम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापन समितीकडून कामापेक्षा जास्त काढून घेतलेली 3 लाख 2 हजार 643 रुपये रक्कम वसूल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली आहेत.
95 टक्के निधी घेऊनही वर्गखोल्या अपूर्ण
अजंग पाईप-कारखाना येथील शाळेला वर्ग खोल्यांसाठी 2012-13 मध्ये निधी मंजूर करण्यात आला होता. यासाठी सर्वशिक्षा अभियान योजनेतून मिळालेला 95 टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीने काढून घेतला. समितीने 8 लाख 12 हजार 250 रुपये निधी काढून घेऊनही बांधकाम अपूर्ण ठेवले. यासंदर्भात वेळोवेळी सर्वशिक्षा अभियानच्या बांधकाम विभागाकडून यासाठी पाठपुरावा केला. तरीही शाळेने ही गोष्ट गंभीरतेने घेतली नाही. सर्वशिक्षा अभियान अंतर्गत या कामाचे मूल्यांकन केले असता फक्त 6 लाख 53 हजार 207 रुपयाचेच काम पूर्ण करण्यात आले आहे. शाळा बांधकामाची 1 लाख 59 हजार 43 रुपये रक्कम जास्तीची काढून घेण्यात आली आहे. या पूर्ण रकमेची वसूली शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात येणार आहे.