जैताणे : साक्री तालुक्यातील आदिवासी बहुल समाज असलेल्या उभरांडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून ऊसतोडणी करणाऱ्या पालकांसोबत परराज्यात स्थलांतरीत होणाºया विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतीगृहाचे उद्घाटन केंद्रप्रमुख अशोक देसले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याहस्ते करण्यात आले.तत्पूर्वी अनेक दिवसांपासून शाळेमध्ये हंगामी वसतीगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. शासनाला प्रस्ताव सादर करणे, पालकांचे उद्बोधन करणे आदी कामे करण्यात आली होती.शाळेमध्ये पालक सभा आयोजित करून आणि घरोघरी जाऊन पालकांची भेट घेऊन सर्व स्थलांतरीत होणाºया पालकांना हंगामी वसतीगृह सुरू करण्यात येणार असल्याबाबत शाळेच्या शिक्षकांनी माहिती दिलेली होती.पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या पाल्यांना हंगामी वसतिगृहात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु तरीही काही विद्यार्थी पालकांसोबत मध्यप्रदेश राज्यातील मेलन, पानसेमल, रायखेड, खेतीया, खांडसरी येथे स्थलांतरीत झाले होते.त्यामुळे शाळेचे उपमुख्याध्यापक आणि प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांनी अशा मुलांचा तेथे प्रत्यक्ष जावून गावोगावी, शेतांमध्ये शोध घेत ३० विद्यार्थ्यांना स्वखर्चाने गाडीने परत आणले. आणि हंगामी वसतीगृहात दाखल करीत शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सामील केले.१ डिसेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या शाळेतील हंगामी वसतीगृहात ३१ विद्यार्थी निवासी असून शासन निर्देशाप्रमाणे त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंतचा सर्व खर्च प्रकाश बच्छाव यांनी केलेला आहे.हंगामी वसतीगृहाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख अशोक देसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक सदाशिव पाटील, उपमुख्याध्यापक प्रकाश बच्छाव, सुनील जाधव, वसंत तोरवणे, विजय न्याहळदे, कावेरी सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सावळे, उपाध्यक्ष सुकदेव शेलार, गटनेते नारायण सावळे, प्रभाकर वाघ, शरद पवार, गिरिधर ठाकरे, सुरेश सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
३१ विद्यार्थी आणले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:23 PM