धुळे - जिल्ह्यात ४ ते ८ मार्च २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. यात जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २ हजार ८५९.५८ व फळपिकाचे ९०.३९ असे एकूण २ हजार ९४९.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ६२८१ असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी ४ कोटी २ लाख ३१ हजार रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.
४ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. या अवकाळीमुळे गहू, हरभरा, मका, बाजरी या रब्बी तसेच केळी, पपई, डाळींब, आंबा या फळ पिकांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.
अवकाळीचा सर्वात जास्त फटका शिंदखेडा तालुक्याला बसलेला आहे. या तालुक्यात ६४ गावांमध्ये २९३२ शेतकऱ्यांचे १ हजार ५५५६.१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यात ३० गावातील १८२३ शेतकऱ्यांचे ८१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. शिरपूर तालुक्यात ७३ गावांमध्ये १५२४ शेतकऱ्यांचे ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तर सर्वात कमी अर्थात नगण्य नुकसान धुळे तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात केवळ दोन गावांमध्ये दोन शेतकऱ्यांचे १.२० हेक्टर क्षेत्रावरील फक्त पपई पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.