धुळे : सध्या उन्हाळी सुट्यानिमित्त रेल्वे गाड्यांचा प्रचंड गर्दी आहे. मात्र, जर तिकीट आरक्षित झाले नाही, तर अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे २५ एप्रिल रोजी विशेष तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली.यामध्ये भुसावळ विभागातुन धावणाऱ्या ४२ एक्सप्रेस गाड्यांची तपासणी करण्यात आली असून, एकाच दिवसात तब्बल ४ हजार १९० प्रवासी विनातिकीट आढळून आले आहेत. या प्रवाशांकडुन ३३ लाख ३५ हजार ३१० रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
भुसावळ रेल्वे विभागातुन दिवसभरात विविध मार्गावर अप व डाऊन मिळून ६० एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तसेच सध्या उन्हाळा सुरू असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे काही विशेष गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा असतानांही, अनेक प्रवासी हे विनातिकीट प्रवास करत असल्यामुळे भुसावळ विभागाचे डीआरएम एस. एस. केडिया व वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक डॉ. शिवराज मानसपुरे यांनी २० पथकंची नियुक्ती करून भुसावळ विभागातुन धावणाऱ्या महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिम राबविली. विशेष म्हणजे या पथकांसोबत सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचींही नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कारवाई मोहिम राबवून, ४ हजार १९० विनातिकीट प्रवासी पकडले. थेट बडनेरा ते ईगतपुरी स्टेशन पर्यंत ही कारवाई मोहिम राबवुन, त्यांच्याकडुन ३३ लाख ३५ हजार ३१० रूपयांचा दंड वसुल केला.
पोलिसांनी पाठलाग करून फुकट्या प्रवाशांना पकडले..
रेल्वे गाडीत किंवा स्टेशनावर तिकीट तपासणी करतांना मनमाड, चाळीसगाव, भुसावळ या ठिकाणी काही विनातिकीट प्रवासी पळ काढतांना दिसून आले.यावेळी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी या प्रवाशांचा पाठलाग करून, त्यांना पकडले. त्यानंतर त्यांच्याकडुन दंड वसुल करण्यात आला. रेल्वेच्या या कारवाई मोहिमेची दिवसभर चाकर मान्यांमध्ये चर्चा होती.
प्रवाशांनी तिकीट काढुनच प्रवास करणे गरजेचे आहे. तसेच जनरल तिकीट काढले असेल, तर जनरल बोगीतुनच प्रवास करावा, आरक्षित डब्यातुन प्रवासकरू नये. तसेच प्रवाशांना घर बसल्या तिकीट काढण्यासाठी युटीएस ॲपची सुविधा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार असून,जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा. डॉ. शिवराज मानसपुरे, सिनिअर डीसीएम, भुसावळ रेल्वे विभाग.