धुळे : साक्री रोडवरील पद्मनाभनगरात चोरी झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्चाखाली शनिवारी पहाटे नाकाबंदी करण्यात आली़ यावेळी दोन जण दुचाकीवरुन वेगाने जात असताना त्यांना सिनेस्टाईल पकडण्यात आले़ अवघ्या दोन तासात त्यांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले़ दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोघांवर यापुर्वी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३५ गुन्ह्याची नोंद आहे़ एकावर तर मालेगाव पोलीस ठाण्यात अग्नी शस्त्राचा गुन्हा दाखल असल्याने मालेगाव पोलिसांनी रोख बक्षीस जाहीर केले होते़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी शनिवारी पहाटे ३ ते ६ या वेळेत कोम्बिंग आॅपरेशनचे आदेश दिले होते़ त्यानुसार, शहर पोलीस कोम्बिंग आॅपरेशन करीत असताना जाकीर शेख हुसेन (रा़ पद्मनाभनगर) यांच्या घरी चोरट्याने घरफोडी करुन सोन्याचे दागिने, मोबाईल व रोकड चोरी झाल्याची माहिती मिळाली़ लागलीच पोलिसांनी साक्री रोड भागात पहाटेच नाकाबंदी केली़ त्यावेळी जगदीशनगर मोगलाईकडे दोन जण दुचाकीवरुन भरधाव वेगाने जाताना दिसून आले़ पोलिसांना संशय आल्याने सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले़ त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता इम्रान उर्फ बाचक्या शेख खलीद, वसीम जैनुद्दीन शेख अशी त्यांची नावे समोर आली़ त्यांच्या अंगझडतीतून ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल त्यात, सोन्याची पोत, चांदीचे लहान मुलांचे दागिने, मोबाईल आाणि २ हजार ४६० रुपये रोख असा मुद्देमाल मिळून आला़ याशिवाय घरफोडी, चोरी करण्याचे हत्यार, टॅमी, स्क्रू ड्रायव्हर आणि २५ हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा ऐकून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़या संशयितांनी कुमारनगर परिसरातील मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम व चिल्लर असा ऐवज चोरल्याची कबुली चौकशीतून दिली आहे़ दोन्ही चोरट्यांनी रात्रीतून ३ ठिकाणी घरफोडी चोरी केली असून सर्व मुद्देमाल दोन तासांच्या आत हस्तगत करण्यात यश आले आहे़ही कामगिरी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, कर्मचारी भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, सतिष कोठावदे, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सचिन साळुंखे, अविनाश कराड, नवल वसावे, वाहन चालक भदाणे यांनी ही कारवाई केली आहे़ दरम्यान, इम्रान उर्फ बाचक्या शेख याच्यावर मालेगाव पोलिसांनी बक्षिस जाहीर केले होते़
३५ घरफोड्या करणारा बाचक्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:09 PM