आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या ३५० प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या आॅनलाइन पद्धतीने शनिवारी करण्यात आल्या. या शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले असून, त्यांना सोमवारी शाळेत हजर व्हायचे आहे.प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकतेबरोबरच गतिमानता यावी या उद्देशाने शासनाने दोन वर्षांपासून संगणकीय बदली प्रक्रिया धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार संवर्ग १,२,३,४ तयार करून, त्या पद्धतीने बदल्या हेऊ लागल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया मार्च महिन्यातच सुरू करण्यात आली होती. मात्र १० मार्च पासून लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने, बदली प्रक्रिया थांबली होती. आचारसंहिता सुरू होताच पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. अखेर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होण्याच्या दोन दिवस अगोदरच ही बदली प्रकिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पारित केले. यात धुळे तालुक्यातील ६४, साक्री तालुक्यातील १५०, शिंदखेडा तालुक्यातील ५७ व शिरपूर तालुक्यातील ७९ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यात संवर्ग १च्या ८१, संवर्ग-२च्या ५७, संवर्ग ३च्या चार, व संवर्ग४ मध्ये २०८ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत.कार्यमुक्तीचे आदेश दिलेदरम्यान ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांना शनिवारीच कार्यमुक्तीचे आदेश दिले असून, बदली झालेल्या शिक्षकांना सोमवारी बदली झालेल्या ठिकाणी रूजू व्हायचे आहे.२०१७-१८ मध्ये संवर्गातील घोळामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याच झाल्या नव्हत्या. तर २०१८-१९ मध्ये १ हजार २५३ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या होत्या. यावर्षी त्यामानाने केवळ ३५० शिक्षकांच्या बदल्या झाल्या. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पारदर्शकतेने होण्यासाठी शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
धुळे जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 9:30 PM