धुळे : भोई समाज महासंघातर्फे शहरातील केशव गार्डनमध्ये राज्यस्तरीय उपवर वधू-वरांचा परिचय मेळावा घेण्यात आला़ मेळाव्यात राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश राज्यातून समाजबांधवांनी उपस्थिती दिली होती़ मेळाव्यात २१६ मुली, १५६ मुले अशा एकूण ३७२ जणांनी आपला परिचय करुन दिला़महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे, सेवानिवृत्ती जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, महासंघाचे सचिव वसंतराव तावडे, पुण्याचे उद्योजक भगवान गवळी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे उपस्थित होते़गणेश मोरे म्हणाले, महासंघातर्फे तीन राज्यातील समाजबांधवांसाठी हा परिचय मेळावा होता़ समाजबांधवांच्या वेळेसह पैशांची बचत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़ मेळाव्यामुळे समाजाचे एकत्रिकरण होण्यास मदत झाली़ महासंघातर्फे अंध, अपंग, विधवा, विधूर, घटस्फोटीता व वयस्करांचाही परिचय मेळावा घेण्यात आल्याची माहिती मोरे यांनी दिली़यावेळी उपस्थितांच्या हस्ते वधू-वरांची माहिती असलेल्या सप्तरंगी योग २०१९ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले़ मेळाव्यात ५१ जणांना समाज भूषण पुरस्कार, दोन जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला़ वसंत तावडे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला़ समाजबांधवांची उपस्थिती होती़रुपेंद्र तावडे यांनी सुत्रसंचालन केले़ जिल्हा भोई समाज महासंघातर्फे शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ त्यात विवाहापुर्वी वधू-वरांची एचआयव्ही चाचणी करणे, वेळेवर लग्न लावणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करणे आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे़यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़
३७२ उपवर वधूंनी दिला स्वत:चा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 11:44 PM