धुळे: राज्य शासनाने महिलांना एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू केल्यानंतर, दिवसेंदिवस महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे. ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेला सध्या १ महिना पूर्ण झाला असून, या महिनाभरात राज्यातील ४ कोटी ३८ लाख ६४ हजार ६२५ महिलांनी ५० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक लाभ हा पुणे जिल्ह्यातील १ कोटी ११ लाख ६५ हजार १३४ महिलांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाच्या ७५ वर्षे पूर्ण केेलेल्या नागरिकांना बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. त्यानंतर यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी करून बसमध्ये महिला व मुलींना सरसरक तिकीट दरात ५० टक्के सवलत लागू केली आहे. या सवलतीचा राज्यभरातील महिला मोठ्या संख्येने लाभ घेत असून, प्रत्येक मार्गावर प्रवास करताना महिलांची संख्या दिसून येत आहे. एसटी महामंडळाचे राज्यात सहा विभाग असून, या सर्व विभागांमध्ये महिला प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले.
खान्देशात ४१ लाख महिलांनी केला प्रवास...एसटी महामंडळाच्या ५० टक्के तिकीट सवलतीमध्ये खान्देशातील धुळे व जळगाव जिल्ह्यातील ४१ लाख ९६ हजार ८४९ महिलांनी प्रवास केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील २३ लाख ७९ हजार ४१४ महिलांचा समावेश आहे. तर धुळे जिल्ह्यातील १८ लाख १७ हजार ४३५ महिलांचा समावेश आहे. एसटी महामंडळाच्या धुळे विभागात नंदुरबार जिल्हा जोडला असल्याने, या १८ लाख महिला प्रवाशांमध्ये नंदुरबार जिल्ह्याचीही माहिती असल्याचे सांगण्यात आले.
शासनाने ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत सुरू केलेल्या ५० तिकीट सवलतीचा पहिल्या दिवसापासून महिला-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे; तसेच ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सवलतीच्या माध्यमातू स्वस्त, सुरक्षित आणि सन्मानजनक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.-अभिजित भोसले, मुख्य जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ.
राज्यातील विभागनिहाय महिला प्रवाशांची संख्या
- विभाग : प्रवासी संख्या
- छत्रपती संभाजीनगर - ६५ लाख ८८ हजार ६८०
- मुंबई विभाग - ८२ लाख ६६ हजार ३९३
- नागपूर विभाग- ५२ लाख ९० हजार ७२७
- पुणे विभाग- १ कोटी ११ लाख ६५ हजार १३४
- नाशिक विभाग- ७९ लाख २४ हजार ५०
- अमरावती विभाग-४६ लाख २७ हजार ६४१