धुळे : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांत ४ जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
इच्छापूर्ती गणपती मंदिर
नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्रीकडून धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर धुळ्यानजीक इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळील पुलाच्या बाजूला भरधाव वेगाने येणारी कारने (जीजे ०५ आरके ६२८०) दुचाकीला (एमएच १८ एएस १३२५) जोरदार धडक दिली. अपघाताची ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथील दिनेश दामू पगारे, प्रवीण पांडुरंग थोरात आणि पंडित सुका पाटील या तिघांना गंभीर दुखापत झाली. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना दिनेश पगारे आणि प्रवीण थोरात यांचा मृत्यू झाला तर, पंडित पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. फरार कारचालकाविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
दहिवेल गावाजवळील घटना
नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावर साक्री तालुक्यातील दहिवेल येथील हॉटेल शिवम समोरील रस्त्यावरून गोपाल किसन जामूरकर (वय ३२, रा. जावरगिरी ता. धारणी, जि. अमरावती) हा तरुण पायी चालत होता. अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात तो फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात रविवारी मध्यरात्री अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
झंझाळे गावाजवळील घटना
साक्री तालुक्यातील झंझाळे गावाकडून घोडदे गावाकडे जाणाऱ्या रोडवर दुचाकीवरून जात असताना रूपाली कैलास बोरसे (वय २२, रा. म्हसदी प्र. पिंपळनेर ता. साक्री) या महिलेचा साडीचा पदर दुचाकीत अडकला आणि ही महिला रस्त्यावर फेकली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची घटना ३ एप्रिल रोजी पावणेनऊ वाजता घडली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी विजय राम पवार (रा. म्हसदी, प्र. पिंपळनेर, ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी दुपारी सव्वाचार वाजता रामू ऊर्फ रामदास बोरसे (वय २५, रा. म्हसदी, प्र. पिंपळनेर, ता. साक्री) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.