रवींद्र राजपूत
मालपूर (धुळे) : अज्ञात माथेफिरूने जाळी तोडून पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याने, सुमारे ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकाचे दोन लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी अद्याप पंचनामा करण्यात आलेला नाही.
मालपूर येथील योगेश सोनवणे, विलास माळी यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. गावालगतच त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. बुधवारी सायंकाळी अज्ञात माथेफिरूने शेडची मागील जाळी तोडून या कोंबड्यांना गव्हाच्या दाण्यात काही विषारी पदार्थ टाकल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कुक्कुटपालन करणाऱ्यांनी या कोंबड्यांना खाद्य व पिण्याचे पाणी दिले. यावेळी सर्व कोंबड्या सुखरूप होत्या. मात्र साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास योगेश सोनवणे, विलास माळी पुन्हा त्यांची देखरेख करण्यासाठी गेले असता तेथे सर्वच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. यावेळी पोल्ट्री फार्मच्या मागील बाजूची जाळी तोडून अज्ञात माथेफिरूने गव्हाच्या दाण्यामधे विषारी पदार्थ टाकल्याचे आढळून आले. यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आलेला नव्हता.
दोन दिवसांपूर्वीच तेले शिवारात नानाभाऊ भिल यांच्या शेडमध्येही असाच प्रकार घडला. अज्ञाताने कोंबड्यांना विषारी पदार्थ खाऊ घातल्याने नानाभाऊ भिल यांच्या २०० कोंबड्या दगावल्या.