धुळे : विवाह जुळविताना वधू आणि वरांना विश्वासात घेण्याची नितांत गरज आहे़ त्यासाठी कोणतीही बळजबरी करता कामा नये़ हुंडा, सोने-कपड्यांवरुन लग्न मोडू नका, असे आवाहन मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले़ या परिचय मेळाव्यात तब्बल ४५ जणांचे विवाह जुळल्याचे सांगण्यात आले़खान्देशातील मराठा समाजाचे राज्यस्तरीय वधू-वर सुचक व संकलन केंद्राच्यावतीने रविवारी शहरातील केशरानंद मंगल कार्यालयात वधू-वर मेळाव्यात ३७२ उपवर तरुण-तरुणींनी परिचय करुन दिला़ त्यातून मेळाव्यातच ४५ विवाह मार्गी लागले़ अध्यक्षस्थानी शिवतीर्थ ज्येष्ठ नागरीक संघाचे शिवाजी पवार होते़ यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, पालकमंत्री दादा भूसे, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, ज्ञानेश्वर भामरे, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ़ सुलभा कुवर, व्ही़ के़ भदाणे, अॅड़ एम़ एस़ पाटील, जयहिंद संस्थेचे चेअरमन अरुण साळुंखे, माजी आमदार संभाजी पाटील, अॅड़ जे़ टी़ देसले, जे़ यू़ ठाकरे यांच्यासह मेळाव्याचे आयोजक संतोष सूर्यवंशी उपस्थित होते़विवाह जुळविताना वधू-वरांना विश्वासात घ्या़ त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करु नका़ आवश्यक त्या चाचण्या डॉक्टरांकडून करुन घ्या़ हुंडा, सोने आणि कपडे या कारणावरुन कधीही विवाह मोडू नका़ अवाजवी मागण्या आता बंद करा, असे आवाहन अॅड़ जे़ टी़ देसले, डॉ़ योगेश सूर्यवंशी, प्रा़ शरद पाटील, अॅड़ एम़ एस़ पाटील यांनी आपल्या मनोगताद्वारे केले.तर, शेतकरी, अपंग, घटस्फोटीत, विधवा यांच्या विवाहाबाबत सहानुभूतीपुर्वक समाजाने विचार करावा, असा आग्रह संतोष सूर्यवंशी यांनी धरला़मेळाव्याचे सुत्रसंचालन प्रा़ डॉ़ इंदिरा पाटील, नूतन पाटील यांनी केले़ उपस्थितांचे आभार आयोजक संतोष सूर्यवंशी यांनी मानले़ मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी रंगराव पाटील, एस़ के़ पाटील, जिजाबराव पाटील, प्रकाश पाटील, गणेश अहिरराव, सुमित पाटील, वायक़े़ पाटील, बोढरे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले़
धुळ्यात मराठा समाजाच्या मेळाव्यातून जुळले ४५ विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 10:20 PM