धुळे: मुलं पळवण्याच्या संशयावरुन धुळ्यात काल जमावानं पाचजणांची ठेचून हत्या केली. या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. साक्री तालुक्यामधील राईनपाडा या आदिवासी पाड्यावर काल (1 जुलै) पाचजणांची हत्या करण्यात आली. मुलं पळवणारी टोळी गावात आल्याची अफवा पसरल्यानंतर आक्रमक झालेल्या जमावानं हे राक्षसी कृत्य केलं. राईनपाडा या आदिवासी गावात काल आठवडे बाजार भरला होता. या बाजारात काहीजण फिरत होते. यावेळी गावात मुलं पळवणारी टोळी आल्याचा संशय काहींना आला. यानंतर तशी अफवा गावात पसरली आणि जमावानं पाचजणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत पाचही जणांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे मृतदेह जमावानं ग्राम पंचायतीच्या कार्यालयात आणून टाकले. मृतांमध्ये भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर मालवे, अगनू इंगोले यांचा समावेश आहे. हे चौघेही मंगळवेढ्याचे रहिवासी आहेत. तर मारहाणीत मृत्यूमुखी पडलेले राजू भोसले हे कर्नाटकचे रहिवासी आहेत. या प्रकरणी रविवारी 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी गावात मोठा फौजफाट तैनात केला आहे.
धुळे हत्याकांड प्रकरणात 23 जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 9:03 AM