लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धुळे तालुक्यातील नेर येथे ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत १२ ते १६ आॅगस्टपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे.मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांच्या संपर्कातील ३६ जणांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना नेर येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात २० तर खाजगी लॅबला १६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सकाळी ग्रामपंचायत आवारात सर्वपक्षीय बैठकीत वाढत्या रुग्ण्संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच पाच दिवस सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नेर गावातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावात पाच दिवासांसाठी जनता कर्फ्यू लागू केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद राहणार असून नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरपंच शंकर खलाणे यांनी दिला आहे.नेर गाव हे धुळे-सुरत महामार्गावरील बाजारपेठेचे गाव आहे. यामुळे गावाची लोकसंख्याही अधिक आहे. सुरुवातीपासून कोरोनाबाबत खबरदारी घेण्यात येत असतानाच कोरोनाने गावात शिरकाव केला आहे. एका हॉटेल व्यवसायिकाच्या आईला कोरोना झाल्यानंतर गावात एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गावाने कोरोनावर मात केली होती. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन रुग्ण आढळून आले होते. तसेच एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली होती. तरीही अनेक नागरिक हे मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, बाहेरगावी अनावश्यक प्रवास करीत आहेत. त्यामुळेच पुन्हा गावात कोरोनाने जोरदार शिरकाव केला आहे. आता पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वत: सह कुटुंबाची काळजी घेऊन घरातच सुरक्षित रहावे. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.नेर गावात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायतीने अधिकच खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गावाची लोकसंख्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक फैलू नये म्हणून ग्रामपंचायतीने गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते १६ आॅगस्टपर्यंत गाव बंद ठेवण्यात येणार आहे.यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकान सुरू राहतील. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते हे गावात लक्ष ठेवून राहणार असून कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.
कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने ५ दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:59 AM