दोंडाईचा : पर्यावरणाला घातक असलेल्या पन्नास मायक्रॉन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांना बंदी असूनही दोंडाईचात बिनधास्त प्लॅस्टिक पिशव्या विक्री व वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पालिका सूत्रांनी धाड टाकली. त्यात चार दुकानदारांकडून ५० किलो प्लॅस्टिक कॅरी बॅग जप्त केले असून त्यांचा कडून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.शासनाने प्लॅस्टिक विरोधी धोरण अवलंबिले असले तरी पर्यावरणाचा विचार न करता बरेच छोटे-मोठे व्यापारी प्लॅस्टिक कॅरीबॅग, इतर प्लॅस्टिक साहित्य विक्री व वापर करतात. शनिवारी नगरपालीका मुख्याधिकारी डॉ.दीपक सावंत, बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत, आरोग्य विभागाचे शरद महाजन व पालिका कर्मचाऱ्यांनी विविध दुकानांची तपासणी केली. त्यात गोपीचंद पुरस्वानी, मनोहर खत्री, महावैष्णवि प्रॉव्हिजन, श्रद्धा सुपरशॉप या दुकानांकडे कॅरीबॅग आढळून आल्यात.सुमारे ५० किलो कॅरीबॅग पिशव्या आढळल्यात. त्यांना प्रत्येकी पाच हजार दंड ठोठावला असून त्यांना समज देण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
दोंडाईचात ५० किलो कॅरिबॅग जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:22 PM