धुळे : अपघाताचा बनाव करुन बळजबरीने खिशातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून पोबारा करणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात आझादनगर पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेज आणि शरीरयष्टी यावरून पकडल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी ३० हजार रुपये आणि ७० हजारांची दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील हिवरखेडा येथील अर्जुन भिका जोगी (वय ४१) हे म्हशी विक्री करण्याकरिता धुळ्यातील बाजार समितीत ५ डिसेंबर रोजी आले होते. बाजार समितीच्या आवारात पायी जात असताना एकाने त्यांना धडक देऊन खाली पाडले. गर्दी जमा झाल्याची संधी साधून त्यांच्या खिशातून दुसऱ्याने ५० हजारांची रोख रक्कम शिताफीने काढली. यानंतर दोघांनी पोबारा केला. याप्रकरणी ६ डिसेंबर राेजी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि दोघांच्या शरीराची रचना लक्षात घेऊन तपासाला सुरुवात करण्यात आली. रामीक समद शेख (वय २०, रा. नवी मोसाली, सुरत) याने चोरी केल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. माहिती मिळताच त्याला पकडण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याचा साथीदार सईद खान नजीर खान पठाण उर्फ चुव्हा (वय २५, मूळ रा. मानदखाना, ख्वाजा नगर, सुरत. ह.मु वाल्मीक नगर, हुडको, शिरपूर) याला जेरबंद करण्यात आले. त्या दोघांकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३० हजार रुपये रोख आणि एमएच १८ बीडब्ल्यू २६१४ क्रमांकाची ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्या विरोधात गुजरात राज्यात चोरी आणि खुनासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक संदिप पाटील, पोलिस कर्मचारी योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, गौतम सपकाळ, चंद्रकांत पाटील, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिद्धार्थ मोरे, अजहर शेख, धीरज काटकर, संतोष घुगे यांनी ही कारवाई केली.