भिका पाटील, शिंदखेडा :धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील शाखेतून तत्कालीन शाखाधिकारी कम रोखपाल याने गरीब व अशिक्षित खातेदारांच्या बचत खात्यातून बनावट सह्या व अंगठा यांचा वापर करून खातेदारांच्या खात्यातून रकमा परस्पर काढून शासन, बँक व खातेदारांची फसवणूक करून एकूण ५३ लाख ९० हजार ५५८ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस स्टेशनला शाखाधिकारी अरुण धनराज पाटील (वय ५३, रा. निमडाळे, ता. धुळे) याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमठाणे शाखेत १ एप्रिल २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत व्यवस्थापक आणि रोखपाल या पदावर एकत्र काम केलेले अरुण धनराज पाटील यांनी गरीब व निरक्षर खातेदारांच्या बचत खात्यातून त्यांच्या बनावट स्वाक्षरी व त्यांच्या अंगठ्याचा वापर करून खात्यातील रकमेचा अपहार केला होता. याप्रकरणी गुरुवारी शाखाधिकारी प्रभाकर पंजू तावडे (वय ५७, रा. दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात शाखाधिकारी कम रोखपाल याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गोरावडे तपास करीत आहेत.