धुळे : शिरपूर तालुक्यातील अनेर पक्षी अभयारण्यात आठ शाळा आजही झोपडीत भरतात. या शाळांसाठी सर्व शिक्षा अभियान योजनेतून यापूर्वीच 57 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या शाळांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने अगदी कसोशीने प्रयत्न सुरू केला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यासंदर्भात शाळा बांधकामासंदर्भात राज्यपाल कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या दखलचे ‘लोकमत’ने 11 फेब्रुवारी रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.अशा प्रकारे मिळाली आहे मंजुरीअनेर अभयारण्यात पिरपाणी, सातपाणी, कोईडोकीपाडा, पिंपल्यापाणी, खुटमळी, टिटवापाणी, चिंचपाणी, सोजापाडा या आठ शाळा आहेत. या शाळांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत बांधकामासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. 2007-2008 मध्ये दोन शाळांसाठी 13 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रती शाळा 6 लाख 75 हजार रुपयेप्रमाणे हा निधी मंजूर आहे. यानंतर 2008-2009 मध्ये दोन शाळांसाठी प्रती शाळा 6 लाख 75 हजार रुपयांप्रमाणे 13 लाख 50 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर 2009-10 मध्ये चार शाळांसाठी साडेसात लाखांप्रमाणे 30 लाख रुपये निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या शाळा पक्षी अभयारण्यात असल्यामुळे येथे बांधकाम करण्यासाठी वनविभाग परवानगी देत नाही. 75 टक्के निधी शाळांना वर्गबांधकामासाठी निधी मंजूर झाल्यानंतर 75 टक्के निधी शाळेच्या नावावर वर्गही करण्यात आला होता. परंतु वनविभागाकडून परवानगीच न मिळाल्याने पुन्हा हा निधी सर्व शिक्षा अभियानाच्या जिल्हा कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.प्रशासनाचा पाठपुरावाया शाळांच्या बांधकामासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी पी.ङोड. रणदिवे यांनी खूप पाठपुरावा केला आहे. त्यांनी वेळोवेळी वनविभागाच्या अधिका:यांबरोबर बैठकाही घेतल्या आहेत. धुळे येथील वनअधिका:यांनी यासंदर्भात नाशिक विभागाकडेही प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी नाशिक येथील कार्यालयात जाऊन नुकताच पाठपुरावा केला आहे. वनविभागाचा कारभार केंद्राच्या अखत्यारित येत असल्यामुळे परवानगी मिळण्यास अडचणी येत आहेत.बांधकाम परवानगीसाठी संयुक्त बैठक 21 रोजीसर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत राखीव अनेर पक्षी अभयारण्यात शाळा बांधकामासाठी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शाळांना वनविभागामध्ये परवानगी देण्याबाबत विस्तारित चर्चा करण्यात येणार आहे.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, वनविभागाचे अधिकारी, शिरपूर तहसीलदार, शिरपूर गटशिक्षणाधिकारी, बीडीओ उपस्थित राहणार आहेत.
झोपडीतील शाळांसाठी 57 लाख मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 11:33 PM