धुळे : अवधान एमआयडीसी येथील डिसान ॲग्रो टेक कंपनीतील तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन ५५ ते ६० लाख रुपये किमतीचा डीओसी पेंड माल वजन काट्यावर मापात पाप करुन कंपनीला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच मोहाडी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. फसवणुकीचा हा प्रकार १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील आहे.
कंपनीतील अधिकारी अशोक मुकुंदा सोनार (वय ५२, रा. प्लॉट नंबर १०, महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत अवधान एमआयडीसीतील डिसान ॲग्रो टेक प्रा.लि. कंपनीतील तीन कर्मचारी यांना कंपनीने गोडावून सुपरवायझर व वजन काटा ऑपरेटर पदाचे काम विश्वासाने सुपुर्द केलेले होते. असे असताना तिघांनी आपापसात संगनमत करुन कंपनीतील डीओसी पेंड माल खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये ऑर्डरप्रमाणे भरुन दिल्यानंतर वाहनाचा वजन काटा करुन संबंधित वाहन कंपनीच्या बाहेर सोडून दिले.
मात्र, कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या मार्फत वाहन पुन्हा कंपनीत आणून त्यामध्ये वेळोवेळी १ ते २ टन वजनाचा डीओसी पेंड माल प्रति टन ५० हजार रुपये प्रमाणे अधिक भरुन देऊन त्याबदल्यात संबंधितांकडून मिळणारी रक्कम तिघांनी स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आपापसात वाटून घेतली. तसेच या मालाची चोरी करुन कंपनीचा विश्वासघात करत कंपनीच्या परवानगी शिवाय अंदाजे ५५ ते ६० लाख रुपये किमतीचा माल वाहनांमध्ये अधिक भरुन कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी तीन कर्मचारी विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ४०८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक तपास सहायक पोलिस निरीक्षक भूषण कोते करीत आहेत.