आॅनलाइन लोकमत
धुळे : यावर्षी होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे खरिपाच्या पेरण्या वेगात सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ७९ हजार १०४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या असून, त्याची टक्केवारी ६३.५० टक्के एवढी आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत उर्वरित सर्व पेरण्या पूर्ण होतील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड करण्यात येते. यात सर्वाधिक लागवड ही कपाशीची होत असते. यावर्षी जवळपास २ लाख ५ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होात. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. जून महिन्याच्या सुरवातीपासून टप्या-टप्याने पावसाची दमदार हजेरी लागत आहे. पडणारा पाऊस लक्षात घेऊन शेतकºयांनीही पेरणीच्या कामाला प्राधान्य दिलेले आहे. धुळे जिल्ह्यात कपाशीची २ लाख ५ हजार ४०० हेक्टरपैकी १ लाख ७३ हजार ६६० हेक्टरवर लागवड करण्यात आलेली आहे. आतापर्यंतची ही सर्वात जास्त लागवड आहे. ज्वारीचे पेरणीचे लक्षांक १३ हजार ९०० हेक्टर असून, त्यापैकी ७ हजार २०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तर बाजारीची ६८ हजार १०० हेक्टरपैकी २० हजार ४४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे. मक्याची ६६ हजार हेक्टर पैकी ३३ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आलेली आहे. तर तुरीची ७५०० हेक्टरपैकी ४६६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. मुगाची २१ हजार २०० पैकी ९ हजार ३८३ हेक्टर, उडीदची ७६०० पैकी ३३६५ हेक्टर, भुईमुगची १४ हजार पैकी ७ हजार १९६, तीळीची ४०० पैकी १४८, सोयाबीनची २६ हजार २०० पैकी १७ हजार ५८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. भात, नागलीची अद्याप लागवड नाही जिल्ह्यात फक्त साक्री तालुक्यातच भात आणि नागलीची लागवड करण्यात येत असते. भाताचे ६ हजार हेक्टर तर नागलीचे १७०० हेक्टर पेरणी उद्दिष्ट आहे. मात्र ११ जुलैपर्यंत या दोन्ही पिकांची लागवड झालेली नाही, असे कृषी विभागाने दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. पेरण्यांमध्ये शिरपूर आघाडीवर चार तालुक्यांपैकी शिरपूर तालुका पेरण्यांच्याबाबतीत आघाडीवर आहे. या तालुक्यात १ लाख १४ हजार हेक्टरपैकी ८८ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. या तालुक्यातील पेरण्यांची टक्केवारी ७७. ७५ टक्के आहे. त्याखालोखोल शिंदखेडा तालुक्यात पेरण्या झालेल्या आहेत. या तालुक्यात १ लाख १६ हजार १०० हेक्टरपैकी ७६ हजार २७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी ६५.७० टक्के आहे. तृतीय स्थानी धुळे तालुका आहे. या तालुक्यात १ लाख सहा हजार हेक्टरपैकी ६५ हजार १७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर सर्वात कमी पेरण्या साक्री तालुक्यात झालेल्या आहेत. या तालुक्यात १ लाख ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ४९ हजार १७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. पेरणीची टक्केवारी ४७.५६ टक्के आहे.