ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.13 - शिरपूर-चोपडा मार्गावरील बभळाज गावाजवळ स्पिरीटची वाहतुक करीत असतांना एका वाहनाला पकडून सुमारे 7 लाखाचे स्पिरीट जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चालकास जेरबंद केले आहे.
13 रोजी पहाटेच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक चोपडा रस्त्यावर गस्त घालीत होत़े त्यावेळी गुप्त बातमीवरून एका वाहनात स्पिरीटची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली़ काही वेळातच बभळाज गावाजवळील हॉटेल धरती गार्डनजवळ शिरपूरकडून चोपडाकडे जाणारे वाहन क्रमांक एम़एच़19 एस 8534 हा भरधाव वेगाने येत होता़ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाला पाहून पुन्हा गाडी वेगाने पळविली़ पथकाने पाठलाग करून काही अंतरावरच गाडी पकडली़
गाडी चालक जितू रमेश पावरा (25) रा़मोहिदा-पळासनेर यास गाडीत काय आहे? याची विचारणा केली असता त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली़ परंतु विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून गाडीची तपासणी करण्यात आली़ ताडपत्रीने झाकलेल्या वाहनात निळ्या रंगाचे 14 बॅरल स्पिरीट दिसून आलेत़ चौकशीत त्या 14 बॅरलमध्ये प्रत्येकी 200 लिटरप्रमाणे एकूण 2800 लिटर स्पिरीट असल्याचे उघडकीस आल़े 6 लाख 86 हजाराचे स्पिरीटसह साडेतीन लाखाची गाडी असे एकूण 10 लाख 36 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी़एम़चकोर, व्ही़बी़ पवार, दुय्यम निरीक्षक डी़एस़पोरजे, अनिल बिडकर, अनिल निकुंभे, किरण वराडे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, भालचंद्र वाघ, विजय नाहीदे, रवींद्र देसले यांच्या पथकाने ही गाडी पकडली़