धुळे : क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. त्याचे वाईट वाटून ७० वर्षीय वृद्धाने विष घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून आत्महत्येस प्रवृत्त केले असा आरोप करत वृद्धाच्या मुलाने निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शनिवारी चारजणांविराेधात गुन्हा दाखल झाला. ही घटना साक्री तालुक्यातील हट्टी गाव शिवारात १५ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. जगन दगा पदमोर असे मयत वृद्धाचे नाव आहे. हिरालाल जगन पदमोर (वय ४२, रा. हट्टी खुर्द, ता. साक्री) यांनी फिर्याद दाखल केली.
साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द गाव शिवारात पदमोर यांची शेती आहे. या शेतात नेहमीप्रमाणे जगन दगा पदमोर हे काम करीत होते. १५ जानेवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास चारजण तिथे आले. त्यांनी जगन पदमोर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शेतातील जाणाऱ्या रस्त्याच्या कारणावरून वाद घालण्यात आला. वादाचे पडसाद शिवीगाळ करीत मारहाणीत झाले. चारजणांनी मिळून हाताबुक्क्याने मारहाण केली. यात त्यांना दुखापत झाली. घडलेल्या घटनेचे वाईट वाटून त्यांनी शेतातील फवारणीचे विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
वडील जगन पदमोर यांनी आत्महत्या केली नसून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप करत त्यांचा मुलगा हिरालाल जगन पदमोर यांनी निजमपूर पोलिस ठाण्यात शनिवारी दुपारी पावणे चार वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, चारजणांविरोधात भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड करत आहेत.