धुळे : शहरानजीकच्या बिलाडी रोडवरील स्टार्च फॅक्टरीजवळ एका शेतातील ९० फूट खोल विहिरीत उडी घेत युवक-युवतीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली़ दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बिलाडी रोडवर चंद्रकांत केले यांचे शेत आहे़ त्यांच्या शेतात जागल्या म्हणून चंदू गांगुर्डे हे काम पाहतात़ या शेतातील लहान मुलाला १ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेदरम्यान शेतातील विहिरीजवळ युवक व युवती फिरताना दिसून आले़ त्यामुळे त्याने जवळील जेसीबीचालक बापू कोळी यांना सांगितले़ तोपर्यंत ते दोघे युवक - युवती विहिरीच्या कठड्यांच्या खाली उतरलेले दिसून आले़ तेव्हा तो लहान मुलगा व जेसीबीचालक तिकडे धावले. त्या दोघांना येताना पाहून युवक - युवतीने विहिरीत उडी घेतली़ ते पाहून त्या दोघांनी आरडाओरड केली़ तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित युवकांनी दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ परंतु विहिरीत पाणी जास्त असल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यासंदर्भात लगेचपोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव, देवपूरचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, आझादनगरचे रमेशसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक दीपक ढोके व पोलीस कर्मचारी दाखल झाले़ घटनास्थळी नागरिकांनीही गर्दी केली होती़ पोलिसांकडून बिलाडी येथील पट्टीच्या पोहणाºयांना व राज्य आपत्ती प्रतिसाद दलास बोलविण्यात आले़ पोलीस मित्रांनी काढला मृतदेहपोलीस मित्र दत्तू गोरख अहिरे व संजय उखा अहिरे हे दोघे विहिरीत उतरले़ त्यांनी अर्धा तास पाण्यात शोध घेऊन युवकाचा मृतदेह बाहेर काढला़ दोरीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले़ मात्र पाणी जास्त असल्याने शोध घेऊनही लवकर युवतीचा मृतदेह सापडला नाही.एसडीआरएफच्या जवानांनी शोधला युवतीचा मृतदेहदुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास राज्य आपत्ती निवारण दलाचे (एसडीआरएफ) जवान दाखल झाले़ त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र विहीर खोल असल्याने व दोर लहान असल्याने नवीन दोर मागविण्यात आला. त्याद्वारे लाईफ गार्डची मदत घेत पथकातील आऱ एऩ चौधरी, भूषण पाटील, सुभाष महाले हे विहिरीत उतरले़ त्यांनी पाण्यात जाऊन युवतीचा शोध सुरू केला़ अखेर साडेपाच वाजेच्या सुमारास आऱएऩ चौधरी यांच्या हाताला युवतीचा मृतदेह लागला़ त्यांनी विहिरीत एका कपारीतून मृतदेह पाण्याबाहेर आणला़ त्यानंतर दोरीच्या साहाय्याने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला़ यासाठी त्यांना पोलीस उपनिरीक्षक आर.एन.मोरे, पी.एस. सोनटक्के, पथकातील कर्मचारी के.एल.भामरे, के.एस. महाजन, आर.डी.धनगर, सी.व्ही. गवळी, किरण माळी, डब्ल्यू.डब्ल्यू. शेख, हंसराज पाटील, अमोल पाटील, योगेश बडगुजर, पी.टी. चौधरी यांनी सहकार्य केले. त्यानंतर युवतीचा मृतदेहसुद्धा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़
युवकाच्या मोबाइलवरून ‘क्ल्यू’पोलिसांना युवकाच्या पॅन्टच्या खिशात एक मोबाइल मिळून आला़ मात्र त्याने आत्महत्या करताना मोबाइलमधून सीमकार्ड काढून ठेवलेले दिसून आले़ ते सीमकार्ड एका मोबाइलमध्ये टाकून त्यातील युवकाच्या मामांना संपर्क साधला़ तेव्हा त्यांनी त्याचे नाव व तो देवपुरातील सिंघल कॉलनीत राहत असल्याचे सांगितले़ त्यानंतर युवकाची ओळख पटली़ तर युवतीही त्याच परिसरातील राहणारी असल्याचे स्पष्ट झाले़ रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते़
प्रेमसंबंधातून आत्महत्येची शक्यता़दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे़ त्यांच्या प्रेमाला घरचा विरोध असल्याने त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील होते. कल्पेश हा शिक्षणासाठी तीन वर्षांपासून शहरात राहत होता. तो नेताजी पॉलिटेक्निकमध्ये तिसºया वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता़ तर युवती शहरातील एसएसव्हीपीएस डिप्लोमा महाविद्यालयात शिक्षण घेत होती़ वडील खासगी वाहनावर चालक असल्याने त्याच्याकडे साधी सायकलही नव्हती. त्यामुळे ते दोघे पायीच घटनास्थळापर्यंत आले असतील. घरूनच आत्महत्या करण्याच्या विचाराने ते निघाल्याचा संशय आहे. त्यानुसार दोघांनी विहिरीत आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी युवकाचे बूट व मुलीचा स्कार्प मिळून आला.