धुळे : मुंबई येथील व्यापाऱ्याला कॉपर वायरचे आमिष दाखवून साक्री तालुक्यातील जामदा येथे बोलावून घेण्यात आले. व्यापाऱ्याला व त्यासोबत आलेल्या दोघा-तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील पैसे आणि दागिने असा एकूण ५ लाख ७ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज लुटून नेण्यात आला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी पनवेल पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो निजामपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
फरहान मुक्तार खोत (वय ४२, रा. पटेल मोहल्ला, पनवेल, जि. रायगड) यांनी प्रथम पनवेल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. नंतर ती निजामपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. काॅपर केबल वायरचा व्यवहार करण्यासाठी फरहान खोत यांना संशयितांनी साक्री तालुक्यातील जामदा येथील पवनचक्कीच्या परिसरात बोलावून घेतले. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास खोत हे आपल्या मित्रांसोेबत मुकेश पवार, अक्षय पटेल आणि देसाई (तिघांचे पूर्ण नाव व वय माहीत नाही) यांना भेटण्यासाठी पोहोचले. यावेळी या तिघा संशयितांनी आपल्या अन्य ८ ते १० साथीदारांना बोलावून घेतले. त्या सर्वांनी मिळून खोत यांच्यासह त्यांच्या मित्रांवर हल्ला चढविला. त्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळ असलेली ३ लाख ६७ हजारांची रोकड, १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने असा ऐवज लुटून पोबारा केला. खोत आणि त्यांच्या मित्रांनी स्वत:ला सावरत मुंबई गाठली. पनवेल पोलिस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.