धुळे : तालुक्यातील वार गावात मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण झाली. यात त्याचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल होताच ४ जणांना शनिवारी रात्री सव्वादहा वाजता अटक करण्यात आली, तर दोघे फरार झाले आहेत. गौतम यशवंत वाघ (२२) असे मयत तरुणाचे नाव आहे. सुरत येथील गौतम वाघ हा तरुण धुळे तालुक्यातील वार येथे राहणारे त्याचे काका दादाजी वाघ यांच्याकडे आलेला होता. गावात शुक्रवारी निघालेल्या मिरवणुकीत गौतम सहभागी झाला होता. यावेळी नाचताना त्याचा एकाशी वाद झाला होता. त्यानंतर रात्री गौतम परत आला नाही. त्यामुळे त्याचे काका दादाजी वाघ त्याच्या शोधात निघाले. यावेळी धुळे तालुक्यातील कुसुंबा शिवारात काही तरुण गौतमला मारहाण करताना दिसून आले. त्यांनी तातडीने धाव घेत त्याला त्यांच्या तावडीतून सोडविले. गौतम याला तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ या वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि गुन्ह्यातील संशयित चार जणांना शनिवारी रात्री सव्वादहा वाजता अटक करण्यात यश मिळविले. यात विलास उर्फ कैलास ईश्वर वाघ (वय ३५), सुनील ईश्वर वाघ (वय २७), युवराज ईश्वर वाघ (वय २५), रवींद्र उर्फ सोनू रामदास वाघ (वय २८) (सर्व रा. वार, ता. धुळे) यांचा समावेश आहे. तर या घटनेतील अन्य दोन संशयित फरार असून त्यांच्या मागावर पश्चिम देवपूर पोलिसांचे पथक आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख घटनेचा तपास करीत आहेत.