धुळे: साक्री तालुक्यातील रोहोड शिवारात असलेल्या शेतात लक्ष्मी कुंदन ठाकरे (१६) या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत मुलीचे वडील कुंदन कर्मा ठाकरे (वय ४०, रा. रोहोड, ता. साक्री) यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
ठाकरे यांची साक्री तालुक्यातील रोहोड शिवारात ठाकरे शेती आहे. या शेतात त्यांच्यासह त्यांची पत्नी संगीता आणि मुलगी लक्ष्मी यांनी नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम केले. सायंकाळ झाल्यामुळे घरी स्वयंपाक करण्याचे सांगत कुंदन यांनी आपली मुलगी लक्ष्मी हिला घरी जाण्यास सांगितले. सायंकाळी नेहमीप्रमाणे ते पत्नीसह घरी आल्यानंतर त्यांना मुलगी घरी दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शाेध घेऊनही ती कुठेच सापडली नाही.
त्यामुळे त्यांनी पुन्हा शेतात जावून पाहणी केली असता, शेतातील विहिरीच्या बाहेर लक्ष्मी हिची चप्पल आणि ओढणी दिसून आली. त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत जावून तपासणी केली असता, लक्ष्मी ही बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. तिला विहिरीच्या बाहेर काढून खासगी वाहनाने पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री पावणे बारा वाजता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री पिंपळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस नाईक डी. के. कोळी घटनेचा तपास करीत आहेत. दरम्यान, लक्ष्मी हिने आत्महत्या केली की तिचा कोणी घातपात केला, हे समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच काही बाबी स्पष्ट होणार आहेत.