राजेंद्र शर्मा/ धुळे : शहरालगत असलेल्या मोराणे शिवारात छापा टाकून तालुका पोलिसांनी गतिमंद मुलींच्या बालगृहासमोरील एका बंद खोलीत सुरू असलेला बनावट दारूचा मिनी कारखाना उद्ध्वस्त केला आणि मुद्देमालासह तीन जणांना अटक केली.
धुळे तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सोमवारी मोराणे शिवारात गतिमंद मुलींच्या बालगृहासमोरील एका बंद खोलीत बनावट दारु तयार करण्याचा मिनी कारखाना सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्याआधारे त्यांनी पथक तयार करून सायंकाळी दोन पंचांना सोबत घेऊन छापा टाकला. त्यावेळी तेथे तिघे बनावट दारू तयार करीत असल्याचे आढळून आल्याने मुद्देमालासह या तिघांना ताब्यात घेतले.
अटक केलेल्यांमध्ये मलिंदरसिंग गुरुमुखसिंग सिकलकर (२७, रा. राजीव गांधीनगर, गुरुकुल शाळेजवळ, धुळे, रमेश गोविंदा गायकवाड (४५, रा. चितोड भिलाटी), भिलू भिवसन साळवे (३०, रा.यशवंतनगर, साक्रीरोड, धुळे) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून ६० हजार ४८० रुपये किमतीच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, १८० मिलीच्या २४ बाटल्या, पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल, २० हजार रुपये किमतीची जीजे १६ / एएन१४०९ या क्रमांकाची स्कूटर असा एकूण ९० हजार ७१४ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव गुट्टे, असई विजय जाधव, सुनील विंचुरकर, हेकॉ. रवींद्र राजपूत। पोकाँ रवींद्र सोनवणे, राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ यांच्या पथकाने केली.