तुषार देवरे
देऊर (धुळे) : आईच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेला बिबट्याने अलगद उचलून नेले. मात्र, मुलीचा रडण्याचा आवाज येताच, बालिकेचे वडील आणि आजोबांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेताच, बिबट्याने बालिकेला शेतातच सोडून धूम ठोकली. हा थरार सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धुळे तालुक्यातील देऊर खुर्द शिवारात घडला. पूनम भगवान हाळणर (वय ६ महिने) असे बिबट्याच्या तावडीतून सुटलेल्या सुदैवी बालिकेचे नाव आहे. बिबट्याने तिच्या उजव्या हाताला चावा घेतला असून, तिच्यावर धुळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देऊर खुर्द गावापासून दोनशे मीटर अंतरावर शेती शिवारात गेल्या तीन दिवसांपासून मालेगाव तालुक्यातील रामपुरा येथील हाळणर कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी शेतकरी शरद पोपट देसले यांच्या शेतात मुक्कामी आहेत. नेहमीप्रमाणे जमिनीवरच हाळणर कुटुंब झोपले. आई जयाबाईच्या एका बाजूला अडीच वर्षांचा मुलगा व दुसऱ्या बाजूला मुलगी पूनम आईच्या कुशीत झोपली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने आईच्या कुशीतून पूनमला अलगद उचलले. साधारणतः दहा ते वीस फूट अंतरापर्यंत स्वेटरसह पूनमचा उजवा हात बिबट्याने जबड्यात पकडून बांधावरून कांद्याच्या रोपामधील शेतात झेप घेत पलायन केले. पूनमचा अचानक रडण्याचा आवाज आई-वडिलांना ऐकू आला. पूनमचे वडील व आजोबा यांनी क्षणाचाही विचार न करता, शिताफीने बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला कांदा चाळ असल्याने बिबट्याचा रस्ता बंद झाला होता. तशाच परिस्थितीत जोरजोरात आवाज दिला. तशाच परिस्थितीत जोरजोरात आवाज दिला. बिबट्याने कांद्याच्या रोपामध्ये पूनमला झटका देऊन सोडत, जंगलाकडे धूम ठोकली.