सुनील साळुंखे
शिरपूर (जि.धुळे) : धुळ्यातील एका अट्टल गुन्हेगारास शिरपूर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेरबंद केले. दरोडा प्रकरणाच्या चौकशीसाठी या संशयिताला चोपडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
धुळ्यातील अट्टल गुन्हेगार अब्दुल इस्लाम मोहमंद रफीक चौधरी (३९, रा. भंगार बाजार, धुळे) हा शिरपूर फाट्यावर येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, पो.स्टे.चे डीबी पथकाचे अंमलदार ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, प्रवीण गोसावी, सचिन वाघ यांच्या पथकाने शिरपूर फाट्यावर सापळा रचला.
शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शिरपूर फाट्यावर संशयित आरोपी अब्दुल चौधरी यास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. संशयित आरोपीविरोधात चोपडा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल होता. तेव्हापासून तो फरार होता, पोलिस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी त्यास जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी चोपडा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. काही वेळानंतर लगेच चोपडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनशाम तांबे व त्यांचे पोलिस पथक येथे येऊन आरोपीस ताब्यात घेतले. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अन्साराम आगरकर, पोलिस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे व डीबी पथकाने ही कारवाई केली.