अतुल जोशी, जैताणे/निजामपूर (धुळे): खासगी सावकरांच्या जाचाला कंटाळून जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदा रतन चव्हाण (वय ३३, रा. निजामपूर्) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य दोनजण फरार आहे.
आनंदा चव्हाण यांनी जैताणे येथील तीन जणांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. खासगी सावकारांना व्याजाचे पैसे देऊनही ते वेळोवेळी आनंदा चव्हाण यांच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. तसेच शाळेत व घरी येऊन मारण्याची धमकी देत होते. खासगी सावकारांच्या या जाचाला कंटाळून शिक्षक चव्हाण यांनी आपल्या भाड्याच्या राहत्या घरातील स्टोअररूममध्ये मंगळवारी गळफास घेतला. सायंकाळी उशीरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घरातील स्टोअररूममध्येच त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान याप्रकरणी धनराज रतन चव्हाण यांनी निजामपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका खासगी सावकाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, दोनजण फरार आहेत.आनंदा चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगी गार्गी (वय ४),आरू (वय २), आई, वडील असा परिवार आहे.
चिठ्ठीतून मागितली माफी
मृत्यूपूर्वी आनंदा चव्हाण यांनी पत्नीला चिठ्ठी लिहिलेली सापडली. त्यात ममता मला माफ कर, काही कारणास्तव मी या जगाला सोडून जात आहे. माझ्या गार्गी आणि आरू यांना खूप शिकव. आप्पा, माय, भैय्या काही चुकल असेल तर समजून घ्या. मला त्रास देणं, अशी चिठ्ठी आहे.