मालपूर (धुळे) (रवींद्र राजपूत): शिंदखेडा तालुक्यातील सुराय गावात कापसाच्या काट्यात हातचलाखी करून हेराफेरी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्याला रंगेहात पकडून गावकऱ्यांनी रविवारी चांगलाच चोप दिला. प्रकरण दोंडाईचा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, आतापर्यंत गावातील सर्व खरेदी केलेला चार गाडीतील कापसाची तफावतीनुसार व्यापाऱ्याकडून पाच लाख दहा हजार रुपये कापसाची किंमत वसूल केली. या व्यापाऱ्याला कायमची सुराय गाव बंदी करून सोडून देण्यात आल्याचे सरपंच उज्जनबाई जाधव यांचे सुपुत्र मोहन पांडुरंग जाधव यांनी सांगितले.
सुराय येथे आठवडाभरापासून दोंडाईचा येथील एक खासगी कापूस व्यापारी कापसाची खरेदी करीत होता. साधारण गावातून चार आयशर गाडी भरून कापूस खरेदी करून घेऊन गेला.. मात्र, तो वजन-काट्यात पहिल्यापासून हेराफेरी करीत असल्याचा शेतकऱ्यांचा संशय होता. रविवारी ज्ञानेश्वर पाटील (रा. सुराय, ता. शिंदखेडा) यांचा १२ क्विंटल कापूस मोजून झाल्यावर गाडी भरल्यामुळे उर्वरित कापूस उद्या मोजून घेऊन जाण्याचे ठरले. यानंतर गावातील शेतकऱ्यांनी उर्वरित चार क्विंटल कापूस दुसऱ्या वजन-काट्यावर आधीच मोजून ठेवला होता. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो कापूस त्या व्यापाऱ्याने मोजल्यावर त्याच्या वजन-काट्यात क्विंटलमागे २० किलोंची तफावत आढळून आली. यानंतर गावकऱ्यांनी मापाडींसह सर्वांना चांगलाच चोप दिला.