धुळे : सेंधव्याकडून धुळेमार्गे मालेगावच्या दिशेने कारमधून नेण्यात येणारा गुटखा लळींग टोलनाक्याजवळ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यावेळी वाहनासह ५ लाख ४४ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चालक आणि सहचालकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी करण्यात आली.
मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सेंधव्याकडून धुळे मार्गे मालेगावच्या दिशेने एक कार जाणार असून, त्यात गुटखा असल्याची माहिती मिळताच लळींग टोलनाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला होता. (एमएच ४३, बीके ५९९३) क्रमांकाची कार येताच ती अडविण्यात आली. चालकाकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने कार ताब्यात घेऊन तपासणी केली असता, त्यात गुटखा लपविलेला आढळला. पोलिसांनी गुटखा आणि कार असा एकूण ५ लाख ४४ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक रऊफ युसुफ अख्तार (वय ४८, रा. सरकारनगर, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) आणि सहचालक मुश्ताक मुक्तार (वय ४५) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, कर्मचारी राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, मयूर पाटील, हर्षल चौधरी यांनी केली.