बळसाणे (धुळे) : साक्री तालुक्यातील इंदवे येथे आदिशक्ती इंदाई मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत पहिल्यांदाच बैलगाडीची शर्यत झाली. विशेष म्हणजे या शर्यतीत काठीचा वापर झाला नाही. ही शर्यत शिंदखेड्याच्या शेतकऱ्याने जिंकली.
धुळे जिल्ह्यातील इंदवे येथे प्रथमच बैलगाडा शर्यत झाली. न्यायालयाचे नियम, अटींचे पालन करून ही शर्यत इंदवे येथील ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेच्या वतीने आयोजित केली होती. शर्यतीत धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील १८ बैलजोड्यांनी सहभाग नोंदविला. यात प्रथम क्रमांक राजपाल नरेंद्र पाटील, शिंदखेडा. द्वितीय क्रमांक चेतन भदाणे व युवराज मिस्तरी इंदवे, तृतीय क्रमांक ईश्वर खंडू पाटील वैंदाणे यांनी पटकावला. इंदाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष दिनकरराव पाटील, अशोक देवरे, माजी सरपंच सुनील देवरे, व्ही.एम. देवरे, हाट्टीचे सरपंच त्र्यंबक पदमोर, लक्ष्मीकांत देवरे, पंडित अकलाडे, सरपंच नीलेश देवरे, चतुर देवरे आदी उपस्थित होते.