शिरपूर (धुळे) : भरधाव दुचाकी दगडाला धडकल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शिरपूर तालुक्यातील तेल्यादेव शिवारात २२ मार्च रोजी घडली होती. रुग्णालयात उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला. मिठाराम पारखा पावरा (वय ३५, रा. रोहिणी, ता. शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात सोमवारी अपघाताची नोंद करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील सुळे गावचे पोलिस पाटील सीताराम राजाराम पावरा (वय ३३) यांनी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील तेल्यादेव शिवारात एमएच ४१ एके ३५४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून तरुण भरधाव वेगाने जात होता. दुचाकीचा वेग अधिक असल्याने त्यावरील नियंत्रण त्याचे सुटले. दुचाकी रस्त्याच्या खाली गेली आणि नाल्याच्या दगडाला जाऊन धडकली.
यात तरुण दुचाकीसह फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला आणि अन्य ठिकाणी गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची ही घटना २२ मार्च २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. तरुण अत्यावस्थ पडल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. मिठाराम पारखा पावरा (वय ३५, रा. रोहिणी, ता. शिरपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सेामवारी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक वसावे घटनेचा तपास करीत आहेत.