धुळे : गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून देवपूर भागातील तरुणाची ऑनलाइन पद्धतीने ८५ हजारांना फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. देवपुरातील शारदा नेत्रालयाजवळ जितेंद्र नगरात राहणारा रुपेश सतीश काळे (वय ३४) याने पश्चिम देवपूर पोलिसात याविषयीची फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इवा नामक मुलीच्या मोबाइल क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला. त्यात ‘माझे नाव इवा आहे. मी एक क्रिप्टोकरन्सी व ब्राेकर आहे. मी युवान स्पेसएक्स नावाच्या कंपनीमध्ये काम करत आहे. ही कंपनी हॉगकाँगमध्ये कार्यरत आहे तर कंपनीचा मायनिंग पूल हा कझाकिस्तान देशात असल्याचे म्हटले होते.
रॉबर्ट नावाच्या व्यक्तीने त्यांच्या व्हॉट्सॲप व फेसबूकच्या माध्यमातून ते कझाकिस्तान देशातील इक्युटी या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासविले. त्यांनी गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. रुपेश याच्या नावाचे बनावट प्रतिनिधी असल्याचे प्रमाणपत्र तयार करून ते व्हॉट्सॲपवर प्रसारित केले. याद्वारे त्याची ८५ हजारांना ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दाेघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख घटनेचा अधिक तपास करत आहेत.