धुळे : मालेगाव रोडवरील लळींग घाट परिसरात ट्रक आणि दुचाकी, तर चाळीसगाव रोडवरील विंचूर फाट्यावर कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात महिलेसह तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मोहाडी आणि धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
लळींग घाटात ट्रकची दुचाकीला धडक
आरजे ०६ जीबी ५३०७ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत होता. एमएच १८ सीबी ९५१४ क्रमांकाची दुचाकी अवधानकडून आर्वीकडे जात होती. बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळींग घाटातील लांडोर बंगल्याच्या अलीकडे ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शुभम कैलास सोनवणे (वय २३, रा. आर्वी ता. धुळे) रवींद्र कारभारी सौंदाणे (वय ३५, रा. आर्वी ता. धुळे) या दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेताना शुभम सोनवणे याचा मृत्यू झाला. तर, रवींद्र सौंदाणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मोहाडी रवींद्र सौंदाणे यांच्या फिर्यादीवरून फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कारची दुचाकीला धडक
एमएच १८ बीव्ही ३४८४ क्रमांकाच्या दुचाकीने अशोक परमेश्वर देसले आणि सुलोचना साहेबराव कापडणे (वय ५०) (दोन्ही रा. विंचूर ता. धुळे) हे शेतातून विंचूर गावी घरी येत असताना चाळीसगाव रोडवरील विंचूर चौफुलीवर एमएच २० जीके ७४७३ क्रमांकाच्या कारची दुचाकीला धडक बसली. यात अशोक देसले आणि सुलोचना कापडणे हे दोघेही रस्त्यावर दुचाकीसह फेकले गेले. यात सुलोचना कापडणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी मनोहर युवराज देसले यांच्या फिर्यादीवरून फरार कारचालकाविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर काळे करीत आहेत.