लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : अनेक वर्षांच्या परंपरेनुसार यंदाही आषाढ शुद्ध द्वितीयेपासून येथे श्री विठ्ठल मंदिरात आषाढी उत्सव सोहळ्यास गुरूवार ४ जुलैपासून प्रारंभ होत आहे. सकाळी ध्वजारोहण होईल. तसेच १० जुलैपर्यंत श्रीमद भागवत पारायण सप्ताहाचे आयोजन केले आहे. सकाळी पारायण हभप कृष्णचंद्र पुराणिक महाराज, डोंबिवली हे तर दुपारी भागवत निरूपण हभप शरदचंद्र पुराणिक करतील. उत्सव सप्ताहात रोज रात्री कीर्तन, प्रवचन आयोजन आहे. आषाढ शुद्ध सप्तमीस स्वामी श्री नित्यानंद सरस्वती यांचा पुण्यतिथी सोहळा आयोजन, ११ जुलै रोजी सुखदेव स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा, १२ रोजी आषाढी एकादशी उत्सव, सकाळी पांडुरंगाचा अभिषेक, पूजा, मंदिर गाभाºयात भक्तांची पांडुरंगाच्या आळवणीसाठी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन रंगते.आणि मध्यान्ही महाआरती व विलोभनीय पांडुरंग मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. दुपारी ३ वाजता गावातून विठ्ठल -राही- रखुमाई यांची रथातून मिरवणूक व रात्री कीर्तन रंगते. १३ रोजी द्वादशीदिनी दुपारी ४ वाजता पालखी सोहळ्याने या उत्सवाची सांगता होते. उत्सव स्वामी अच्युतानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली हभप राजेंद्र महाराज, हभप राया महाराज, हभप दयार्नव उपासनी, तुषार उपासनी, कैवल्य उपासनी यांनी भाविकांना उत्सवास उपस्थित राहून पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
निजामपुरात आजपासून रंगणार आषाढी उत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:24 PM