लोकमत आॅनलाईन धुळे : पिंंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील युवकाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीस तब्बल २० वर्षे ४ महिने १२ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. विजय उर्फ पिन्ट्या प्रल्हाद पाटील (४१), रा.चिकसे, ता.साक्री असे या आरोपीचे नाव आहे. नारायण सुकदेव पाटील, रा.चिकसे, ता.साक्री यांनी त्यांचा मुलगा दीपक नारायण पाटील (१७) याचा निर्घृणपणे खून झाल्या प्रकरणी पिंंपळनेर पोलिसांत चार आरोपींविरूद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं १/१९९९, भादंवि कलम ३०२,३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय उर्फ पिन्ट्या हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या वास्तव्याची माहिती मिळत नव्हती. त्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. पण प्रयत्न सुरूच होते. त्यानुसार तो सध्या सुरत शहरात राहत असल्याचे समजले. तेथे जाऊन शोध घेतला. पण आरोपी चतूर असल्याने तो वेळोवेळी त्याचा राहण्याचा व व्यवसायाचा ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व लपवित होता. परंतु २८ रोजी विजय उर्फ पिन्ट्या हा साक्री येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.जे.राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण अमृतकर, सुरेश बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल मोहने, प्रभाकर सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साक्री बसस्थानक परिसरात दबा धरून बसले. त्याचवेळी विजय तेथे येताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले. तो रामपार्क सोसायटी, प्लॉट नं.२१४, नवागाव दिडोली, सुरत (गुजरात) यास खात्री करून अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस २० वर्षांनंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:20 PM