साक्री : सरवड फाटा ते कोंडाईबारी राज्य मार्ग क्रमांक १३ चे काम करणाºया राज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने निजामपूर येथील एका शेतकºयाच्या रोजगाव शिवारातील शेतीतून अवैधपणे माती व मुरूमचे उत्खनन केले आहे. यामुळे संपूर्ण शेती नष्ट झाली असून सदर शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून न्याय मिळावा, यासाठी शासनाकडे व पोलिसांकडे हेलपाटे घालत आहे. परंतू अजून न्याय न मिळाल्याने अन्यायाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकºयाने दिला आहे.निजामपूर येथील पोपट गोटू वाणी यांची रोजगाव शिवारात शेत जमीन आहे. त्यांच्या गट नंबर ८९/ब /२ मधून त्यांच्या संमतीशिवाय शेतातून चांगली माती व मुरूम भरून नेला असून लाखो रुपयांचे गौण खनिजाची चोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या अवैध उत्खननाला शेतकºयांनी विरोध केला असता काही गाव गुंडांकडून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरवडफाटा ते कोंडाईबारी या राज्यमार्ग क्रमांक १३ चे काम राज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने घेतले आहे. त्यांनी रस्त्यासाठी लागणाºया माती, मुरूम व इतर गौण खनिजासंदर्भात महसूल विभागाकडे परवानगी मागितली असता महसूल विभागाने त्यांना ठराविक गटामधून उत्खननास परवानगी दिली होती, असे असतानाही सदर कंपनीच्या कर्मचाºयांनी अवैधपणे शेतकºयांच्या शेतांमधून गौणखनिज चोरून नेले आहे. या शेतकºयांच्या म्हणण्यानुसार रोजगाव शिवारातील वनखात्याच्या जमिनीमधूनही अवैधपणे उत्खनन केले आहे.निजामपूर येथील अन्यायग्रस्त शेतकरी पोपट गोटू वाणी व भुषण पाटील यांनी यासंदर्भात साक्रीच्या तहसीलदारांना तक्रारी निवेदन दिले आहे. परंतू तहसीलदारांनी कोणतीही दखल घेतले नाही. त्यानंतर शेतकºयाने पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परंतू पोलिसांनीही याची दखल घेतली नाही. शेवटी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.राज इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने महसूल विभागाकडे गौण खनिजासाठी नोंदणी केली असता त्यांना विहीरगाव शिवारातील गट नंबर १/११/अ/२/१, १८१०/१६/अ येथून १९०० ब्रास, वासखेडी शिवारातून गट नंबर २८/१ मधून १५००, होडदाणे शिवारातील गट नंबर ९/१० २८/१, २८/२,८/२ येथून ३५००, रोजगाव शिवारातून ग.नं. ६ मधून १५००, गट नं. १५५/३ मधून १५००, जमकी शिवारातून गट नं. ८८/ब/१३/२ येथून २००० व वासखेडी शिवारातून गट नं. २७८/१/ब येथून १५०० अशी परवानगी दिलेली असताना कंपनीने महसूल बुडवत अन्यत्र ठिकाणाहूनही गौणखनिज चोरी केल्याचे उघड झाले आहे. कंपनीने आतापर्यंत ७३ लाख ६५ हजार ५०० रुपये एवढी रॉयल्टी शासनाकडे भरलेली आहे. या व्यतिरिक्त अजून किती ब्रास गौण खनिज वापरले गेले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. शेतकºयांच्या शेतजमिनी उद्ध्वस्त करणाºया कंपनीने परिसरातील गावगुंडांना हाताशी धरून दादागिरी सुरू केली आहे. त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शेतातून अवैध गौणखनिज उत्खननाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:38 PM