धुळे : तीन मेपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढल्याने प्रशासन अधिक गतिमान झाले आहे़ गरीब, निराधारांचा उदरनिवार्हाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत़जिल्ह्यातील गरीब, निराधार व्यक्तींना किमान भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक बोलावून आराखडा तयार करावा. ग्रामपातळीवर ग्राम कृती आराखडा तयार करावा. त्याचे संनियंत्रण तालुकास्तरावरील समितीने करावे. निराधार व्यक्तींच्या मदतीसाठी आवश्यक तेथे स्वयंसेवी संस्था, सधन व्यक्तींची मदत घ्यावी. अशा निराधार व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून गावनिहाय यादी तयार करावी, असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत़धुळे जिल्ह्यात एक एप्रिल नंतर आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपवर जावून नागरिकांनी आपली माहिती भरुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे़ बँकांमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस दलाच्या मदतीबरोबरच टोकन पध्दत सुरू करावी. बँकेत वृध्द व्यक्तींना प्राधान्य द्यावे. बँक सखींची मदत घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत़जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी पूर्वतयारीची बैठक पार पडली़ या बैठकीत आरोग्य विभागाच्या कामांचा तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला़जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी उपलब्ध होणाºया मनुष्यबळाचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. राजकुमार सूर्यवंशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. मनीष पाटील यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, सहाय्यक निबंधक मनोज चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुधाकर शिरसाट, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जे. जे. पवार आदींनी अनुक्रमे कृषी, शेतमाल खरेदी- विक्री, पशुसंवर्धनासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना, पीक कर्ज वितरण, उपप्रादेशिक परिवहन विभागाची माहिती दिली.आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांनी कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी आदिवासी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख संख्येने उपस्थित होते.दरम्यान, तालुका स्तरावर कृती आराखडा तयार करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या़
गरीब, निराधारांच्या उदरनिर्वाहासाठी कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:09 PM