धुळे: शहरातील शिवतीर्थ ते दसेरा मैदानदरम्यान स्टेशन रोडवर झालेले अतिक्रमण दोन दिवसात संबंधितांनी काढून घ्यावे, अन्यथा मनपातर्फे कारवाई केली जाईल, अशी नोटीस मनपाने बुधवारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती़ त्यामुळे स्टेशन रोडवरील नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी महापौर कल्पना महाले व आयुक्त संगीता धायगुडे यांची भेट घेतली़ पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झाल्यानंतरच कारवाई केली जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिल़ेशहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नागरिकांनी शिवतीर्थ (संतोषीमाता मंदिर) ते दसेरा मैदानार्पयत मनपा मालकीच्या रस्त्यावर नागरिकांनी, व्यापारी यांनी अतिक्रमण करून, तसेच धार्मिक स्थळांचे व इतर कच्चे व पक्के बांधकाम केले असून ते दोन दिवसात काढून घ्यावे, अशी नोटीस मनपा नगररचना विभागाने बुधवारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली़ त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले होत़े दरम्यान, गुरुवारी दोन दिवसांची मुदत संपत असल्याने स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारक नागरिक शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी, माजी महापौर मोहन नवले यांच्यासह महापौरांकडे आले होत़े या वेळी आयुक्त संगीता धायगुडे यांच्यासह नगरसेवक चंद्रकांत सोनार, शिक्षण मंडळ सभापती संदीप महाले, सुनील महाले, मनोज मोरे, संजय वाल्हे, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, प्र. नगररचनाकार प्रदीप चव्हाण हे उपस्थित होत़े संबंधित नागरिक स्टेशन रोडवर 1930 पासून राहत असून दोन दिवसात ते कुठे जाणार, असा प्रश्न नवले यांनी उपस्थित केला व आवास योजनेंतर्गत हक्काची घरे दिल्यानंतरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली़ अतिक्रमण हटविण्यास विरोध नाही; परंतु संपूर्ण प्रशासन आमदारांच्या दबावाला बळी पडत असल्याची टीका नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी केली़ स्टेशन रोडवरील नागरिक न्यायालयात गेले असून 21 तारखेला कामकाज होणार आहे, त्यामुळे तोर्पयत अतिक्रमण काढू नये, तसेच पुनर्वसन करण्यासाठी विविध जागांचा विचार करून निर्णय घ्या, अशी मागणी परदेशी यांनी केली़ तसेच आपण गेल्या 15 वर्षात अतिक्रमणांबाबत अनेक तक्रारी केल्या, त्याची दखल का घेण्यात आली नाही? शिवतीर्थ व चौपाटीचे अतिक्रमण काढावे, असेही परदेशी म्हणाल़े मनोज मोरे यांनीही धनदांडग्यांची अतिक्रमणे काढा मगच गरिबांच्या झोपडय़ांना हात लावा असे स्पष्ट केल़े चर्चेअंती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दोन दिवसात पुनर्वसनाबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन या वेळी दिल़ेनोटीस कुणाला विचारून काढली?महापौर कल्पना महाले यांनी प्र. नगररचनाकार प्रदीप चव्हाण यांना सदरची नोटीस कुणाला विचारून प्रसिद्ध केली? अशी विचारणा करीत धारेवर धरल़े यापुढे माहिती दिल्याशिवाय परस्पर नोटिसा काढू नये, असेही महापौरांनी स्पष्ट केल़े
पुनर्वसनाच्या निर्णयानंतरच कारवाई!
By admin | Published: February 10, 2017 12:16 AM