मुंबई - शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे. विखरण येथील 199 हेक्टर जमिनीचे सात दिवसात पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारविरोधात वातावरण तापणार आहे. त्यामुळे राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.
धर्मा पाटील यांच्या तुलनेत इतर शेतक-यांना जास्त मोबदला कसा मिळाला. त्याची चौकशी होईल. धर्मा पाटील यांच्या कुटुंबाचे कुठलेही नुकसान होणार नाही. धर्मा पाटील यांच्या जमिनीसंबंधीचा अहवाल मंगळवारपर्यंत मिळेल. जमीन संपादनात चूक असेल तर व्याजासह अधिक मोबदला देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्याचवेळी औष्णिक प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीसाठी 10 लाख रुपये प्रतिहेक्टर मोबदला देण्याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदखेडयाचे आमदार राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर काही आरोप झाले आहेत. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला रावल यांनी बगल दिली.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे होणा-या औष्णिक वीज प्रकल्पासाठी जमिन संपादन करताना अन्याय झाला असे धर्मा पाटील यांचे म्हणणे होते. पाच एकर जमिनीसाठी फक्त चार लाखाचा मोबदला देण्यात येणार होता. त्यामुळे धर्मा पाटील त्रस्त झाले होते. त्यांनी आपल्यावर होणा-या अन्यायाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अखेर सोमवारी त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.