तिसगाव : मृग आणि आर्द्रा नक्षत्र संपूर्ण तालुक्यासह जिल्हाभरात कोरडे गेले होते, पाऊस न पडल्याने बळीराजाच्या मनात चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या 19 जुलैपासून पावसाचा जोर वाढल्याने दहा वर्षानंतर देवभाने धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.७ जूनपासून पावसाळा सुरू होऊन १८ जुलैपर्यंत संपूर्ण तालुक्यात पाऊस पडला नव्हता. मात्र, १९ जुलैनंतर वरूणराजाने आपला जोर धरल्याने समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी तिसगाव ढंडाने वडेलच्या वन विभागातील उगमस्थानातून येणारी भात नदी, देवभाने येथील धरण जे अनेक वर्षापासून पावसाअभावी पूर्ण क्षमतेने भरत नव्हते, ते या वर्षाच्या पावसामुळे तुडुंब भरले आहे. एकवेळ पावसाअभावी देवभाने येथील धरण यावर्षी भरणार नाही, म्हणून परिसरातील नागरिकांना काळजी वाटत होती.धरणाची निर्मिती झाली त्या दिवसापासून धरण थोडे फार भरत होते. मात्र, कधीच कोरडे पडलेले नव्हते. मात्र, उन्हाची तीव्रता आणि दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे यावर्षी धरणाची पाणी पातळी खालावल्याने धरण कोरडे पडले होते.कापडणे गावाला या धरणातूनच पाणी पोहचत असते. त्यामुळे यावर्षी कापडणेकरांना सर्वात जास्त प्रमाणात पावसाची प्रतीक्षा होती. कापडणेकर डोळे लावून बसले होते की, तिसगाव, वडेल, रामनगर परिसरात पाऊस व्हावा आणि तेथील पाणी गावापर्यंत यावं, अशी आतुरतेने व चातक पक्ष्याप्रमाणे कापडणे येथील ग्रामस्थ वाट पहात आहेत. मात्र, यावर्षी कापडणे गावाची तहान व भात नदी परिसरातील शेतकºयांसाठी नक्कीच या पावसाचा फायदा होणार आहे. २००८ पासून या गावात देवभाने धरणाच्या सांडव्यातून कापडणे धनूर मार्गे सोनवद प्रकल्पामध्ये पाणी जमा होते आणि या सर्व परिसरातील नागरिकांना पाण्याचा दिलासा मिळतो. यावर्षी समाधानकारक पाऊस व धरण भरल्याने आनंदाचे वातावरण आहे.
दशकानंतर देवभाने धरण भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:16 AM