लोकमत न्यूज नेटवर्कधुळे / नेर : वाढीव वीज बिलाच्या विरोधात नागपूर - सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंबा गटाचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुसुंबानजिक रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावर दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात वीज ग्राहकांना दिलेले वाढीव बिल कमी करावे, शेतीपंपाना त्वरित नवीन वीज जोडणी द्यावी, पूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी ट्रान्सफार्मर बसवण्यात यावे, याह विविध मागण्यांसाठी भाजपाचे कुसुंबा गटाचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुसुंबा बायपास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्ग ठप्प झाला होता.लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने सर्वसामान्य जनतेला उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील तर खूप भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यात वीज कंपनीने नागरिकांना वाढीव बिले दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना विजेचा धक्काच बसला आहे. हे विजबील कमी करून मिळण्यासाठी २ जुलै रोजी वीज वितरण कंपनीला रितसर निवेदन दिले होते. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी पुन्हा निवेदन देऊन ११ सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागपूर-सुरत महामार्गावर प्रियदर्शनी पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची पूर्व कल्पना असल्याने धुळे तालुका पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय सारिका कोडापे, एपीआय रुपेश काळे, पीएसआय गजागनन गोटे व पोलीस पथक आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होते. यावेळी वीज कंपनीचे शाखा अभियंता एस़ बी़ गांगुर्डे, भूषण मांडवाल यांनी निवेदन स्वीकारले.या वेळी आंदोलनात जि. प. सदस्य आशुतोष पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, पं.स. सदस्य रितेश परदेशी, नेरचे माजी सरपंच नेर तथा जि.प.गट प्रमुख शंकरराव खलाणे, किशोर शिंदे, मोतीलाल चौधरी, दत्तात्रय परदेशी, आनंदखेडेचे दौलत गांगुर्डे, श्रीकांत चौधरी, चेतन शिंदे, उडाणेचे सुभाष पाटील, शामलाल अहिरे, गोताणेचे दादाभाऊ अहिरे, सुनिल पाटील, समाधान पाटील, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते़ दरम्यान, वाढीव बिलसंदर्भात माहिती घेण्यासाठी कॅम्प लावू़ त्यात ग्रामस्थांना आलेल्या बिलांची आणि मीटरची तपासणी होईल़ चौकशीअंती बिल कमी करण्याचा निर्णय होईल असे शाखा अभियंता गांगुर्डेंनी सांगितले़
शेतीपंपाना त्वरीत वीज जोडणी देण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:17 PM