धुळे : तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गावांसाठी अक्कलपाडा धरणातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी गावाकाठावरील बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने आपल्या मोटारी नदीकाठावरुन काढून घ्याव्यात. अन्यथा नंतर आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सोमवारी दिले आहे.दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नदी काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार अखेर अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.धरणाच्या पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याआधी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी काठावरील ग्रामस्थांना जाहीर आवाहन वजा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, पाझंरा नदी काठावरील गावांसाठी अक्कलपाडा धरणातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे.म्हणून धुळे, साक्री, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील पाझंरा नदी काठावरील जे शेतकरी शेतीसाठी अवैधरित्या विनापरवानगीने पाणी उपसा करीत असतील त्यांनी तात्काळ मोटारी काढुन घ्याव्यात अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच नदी पात्रात पानी सोडण्यात येणार असल्याने सर्वांनी लहान मुल, तसेच पशुधनाची काळजी घ्यावी.
अक्कलपाडातून पांझरा काठावरील गावांसाठी पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:31 AM