धुळे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी झाली होती. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय्य आनंद देणारा अक्षय तृतीयेचा सण समजला जातो. या सणानिमित्ताने सोमवारी बाजारात पेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. घागर खरेदीसाठी गर्दी अक्षय तृतीयेचा सण जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या सणाच्या दिवशी घागर भरण्याची प्रथा आहे. त्यानुसार शहरातील साक्री रोड, जुना आग्रारोड, दत्त मंदिर परिसर, नेहरू नगर पाण्याची टाकीजवळ व अग्रवाल नगर परिसरातील विक्रेत्यांनी घागर विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ५० ते ७० रुपये याप्रमाणे घागर विक्री सुरू होती. अक्षय तृतीयेच्या दिवशी घागरीत पाणी टाकून त्यावर डांगर ठेऊन विधीवत पूजा केली जाते. यामुळे घागरीला मोठे महत्व असते. या सणाच्या दिवशी विशेषत: खापरावर तयार केलेल्या पुरणपोळी व आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखविला जातो. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी माठ, घागर व मातीपासून तयार केलेले खापर यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग दिसून आली. दुचाकी खरेदीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या शो-रूमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. काहींनी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येलाच गाड्या खरेदी केल्या. तर काही नागरिकांनी वाहनांच्या शोरूममध्ये जाऊन नोंदणी करून ठेवली असून मंगळवारी ही वाहने ताब्यात घेणार असल्याने पूर्वसंध्येला लाखोंची उलाढाल झाली.
अक्षय तृतीया: लाखोंची उलाढाल; सोने खरेदीवर महिलांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 6:07 PM
बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी
ठळक मुद्देdhule