आॅनलाइन लोकमतचिमठाणे (जि.धुळे) : धुळ्याहून नंदूरबारकडे जाणारा दारुच्या बाटल्या व कॅनचे बॉक्सने भरलेला ट्रक सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चिमठाणे गावानजीक उलटला. महाग विदेशी दारुने भरलेल्या बाटल्याचे चक्क बॉक्सचे बॉक्स फुकटात मिळाल्याने परिसरातील मद्य शौकीनांची सोमवारी दुपारी दिवाळीच झाली.अनेकांनी याचा फायदा घेतला. अपघातात सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. मात्र लाखोंचे नुकसान झाले.धुळे - नंदुरबार रस्त्यावर सोमवारी दुपारी चिमठाणे गावानजीकच्या पुलाजवळ समोरुन येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने चालकाचा नियंत्रण सुटल्याने धुळयाहून नंदुरबारकडे एम.एच.०४ सीजी ६०३३ क्रमांकाचा विदेशी दारुच्या बाटल्याने भरलेला ट्रक उलटला. ट्रकमध्ये विदेशी कंपनीच्या दारुने भरलेल्या बाटल्या आणि कॅनचे बॉक्स होते. ते रस्त्यावर आणि पुलाच्या खाली पडले. तसेच काचेच्या बाटल्या फुटल्याने रस्त्यावर काचेचा खच्चही पडला. दारु रस्त्यावर सांडल्याने परिसरात दारुचा दर्प पसरला. अपघाताचे वृत्त वाºयासारखे पसरले आणि चिमठाणे गावासह परिसरातील गावातील मद्य शौकीनांनी अपघात स्थळी धाव घेतली. अनेकांनी दारुच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्सच्या बॉक्स लांबविले.वाहतूक ठप्पदारुचा ट्रक उलटल्याने दोन्ही बाजुला गाडयांच्या रांगा लागल्यात. त्यात त्याठिकाणी मद्य शौकीनांची गर्दी झाल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला. घटनेचे वृत्त कळल्यावर चिमठाणे औट पोस्टचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्याठिकाणी जमलेली गर्दी पांगवली आणि अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजुला केला. तसेच दारुच्या बाटल्या फुटल्याने रस्त्यावर पडलेला काचेचा खचही बाजुला केला. त्यानंतर सुमारे एक ते दीड तासाने वाहतूक सुरळीत सुरु झाली.ट्रकमध्ये विदेशी कंपनीचे मद्य असल्याने ३० ते ४० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
धुळे जिल्ह्यातील चिमठाणेजवळ दारू वाहणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:50 AM